भोगवटार वर्ग २ च्या जमिनीवर कर्ज
५५. भोगवटार
वर्ग २ च्या जमिनीवर कर्ज :
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ३६(४)
गावात बबनरावांची नवीन व अविभाज्य शर्तीने
प्रदान केलेली भोगवटादार वर्ग-२ ची इनामी जमीन होती. त्यांना त्यांच्या या जमिनीत
सुधारणा करण्यासाठी कर्ज काढायचे होते. परंतु जमीन भोगवटादार वर्ग-२ ची असल्यामुळे, अशा
जमीनीवर कर्ज मिळते की नाही याबाबत ते साशंक होते.
स्वत:च्या शंकेचे समाधान करण्यासाठी
बबनराव तलाठी कार्यालयात आले. व त्यांनी त्यांची शंका तलाठी भाऊसाहेबांना
विचारली. तलाठी भाऊसाहेबांनी बबनरावांना सांगितले की,
"भोगवटादार वर्ग-२ म्हणून
जमीन धारण करणार्या व्यक्तींना, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ३६(४)
अन्वये, त्यांच्या जमिनीत सुधारणा करण्यासाठी असे कर्ज देणार्या कोणत्याही
बँकेकडून कर्ज घेता येते, त्यासाठी अशी मालमत्ता गहाण ठेवता येते. जर अशा कर्जाची
परतफेड करण्यात, अशा भोगवटादाराने कसूर केला तर कर्ज देणार्या बँकेस अशी
मालमत्ता जप्त करण्याचेही अधिकार आहेत."
तलाठी भाऊसाहेबांकडून सकारात्मक
उत्तर मिळाल्यामुळे बबनरावांचे समाधान झाले.
Comments