रेव्‍हेन्‍यू ग्रँट' व 'सॉईल ग्रँट' नुसार प्रदान केलेल्‍या जमिनी

 


१०१. 'रेव्‍हेन्‍यू ग्रँट' व 'सॉईल ग्रँट' नुसार प्रदान केलेल्‍या जमिनी :

 

वाचा :  बॉम्‍बे लँड रेन्‍हेन्‍यू कोड १८७९, कलम ५३

 

देवस्‍थान इनाम वर्ग ३ च्‍या जमिनीच्‍या एका प्रकरणावर चर्चा करतांना 'रेव्‍हेन्‍यू ग्रँट' व 'सॉईल ग्रँट' नुसार प्रदान केलेल्‍या जमिनी असा उल्‍लेख आल्‍यावरून त्‍याबाबत मंडल अधिकार्‍यांनी स्‍वत:च माहिती देण्‍यास सुरूवात केली.

मंडलअधिकारी म्‍हणाले, देवस्‍थान इनाम वर्ग ३ च्‍या जमिनींचे दोन प्रकार आहेत.

(१) ग्रँट ऑफ रेव्‍हेन्‍यू / रेव्‍हेन्‍यू ग्रँट

(२) ग्रँट ऑफ सॉईल/ सॉईल ग्रँट

 

(१) ग्रँट ऑफ रेव्‍हेन्‍यू: या प्रकारच्‍या जमिनींना शेतसार्‍यामध्‍ये सवलत दिलेली असते. या जमिनींना शेतसार्‍यामध्‍ये सवलत दिलेली असली तरी 'जुडी' वसूल केली जात असे. 'जुडी'चा दर शेतसार्‍याच्‍या २५% असे. ज्‍या जमिनींना शेतसार्‍यामध्‍ये सवलत दिलेली आहे परंतु 'जुडी' वसूल केली जाते त्‍या जमिनी ग्रँट ऑफ रेव्‍हेन्‍यू किंवा रेव्‍हेन्‍यू  ग्रँटच्‍या होत्‍या.

(२) ग्रँट ऑफ सॉईल:  पूर्वीचे राजे किंवा संस्‍थानिकांनी ज्‍या जमिनी देवस्‍थानाला, त्‍या जमिनीतील दगड, धोंडे, तृण, पाषाण, नदी, नाले, गवत, झाडे-झुडपे यांच्‍या हक्‍कासह प्रदान केल्‍या होत्‍या. त्‍यामुळे अशा जमिनींवर राजाला त्‍या जमिनीच्‍या शेतसार्‍यावर कोणतीही जुडी द्‍यावी लागत नव्‍हती. त्‍या जमिनींवरील सर्व हक्‍क देवस्‍थानचे होते. अशा जमिनींना ग्रँट ऑफ सॉईल किंवा सॉईल ग्रँटच्‍या होत्‍या. काही देवस्‍थानांना संपूर्ण गावे सॉईल ग्रँट म्‍हणून प्रदान केलेली आहेत.

एखादी देवस्‍थान जमीन रेव्‍हेन्‍यू ग्रँटची आहे किंवा सॉईल ग्रँटची आहे हे माहित करण्‍यासाठी महत्‍वाचा पुरावा म्‍हणजे त्‍या जमिनीची 'सनद'.

बॉम्‍बे लँड रेन्‍हेन्‍यू कोड १८७९, कलम ५३ अन्‍वये 'सनद' ची तरतुद आहे. आज बर्‍याच जुन्‍या सनद उपलब्‍ध नाही परंतु सन १८६० ते १८६२ दरम्‍यान इनाम कमिश्‍नर यांनी याबाबत चौकशी करून देवस्‍थान इनाम जमिनींची नोंद 'लँड ॲलिनेशन रजिस्‍टर' मध्‍ये केलेली आहे. ब्रिटिश राजवटीत अंदाजे १९२१च्‍या सुमारास, सारा माफीने दिलेल्‍या सर्व इनाम आणि वतन जमिनींच्‍या सविस्‍तर नोंदी बॉम्‍बे लँड रेन्‍हेन्‍यू कोड १८७९, कलम ५३ च्‍या तरतुदीन्‍वये ठेवलेल्‍या 'लँड ॲलिनेशन रजिस्‍टर' मध्‍ये केलेल्‍या आहेत.

Comments

Archive

Contact Form

Send