ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) - आपण आपली पीक पाहणी सातबारा वर कशी नोंदवाल ?

 


ई-पीक पाहणी - आपण आपली पीक पाहणी सातबारा वर कशी नोंदवाल ?

 

ई-पीक पाहणी प्रकल्प - कार्यपद्धत

“माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा”

शेतकरी खातेदार यांचेसाठी महत्वाच्या सूचना -

    ई-पीक पाहणी मोबाईल ॲप स्थापित करा.

स्मार्ट मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाऊनलोड करून स्थापित (install) करावा.

ॲप डाऊनलोड झाल्यानंतर लोकेशन, फोटो साठी येणाऱ्या सर्व सुचनेसाठी Allow करणे. त्याशिवाय शेतातील लोकेशन, फोटो ची अशांश व रेखांश मिळणार नाही.

https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek  

ई-पीक पाहणी मोबाईल ॲप इंस्टॉल झाल्यावर पुढील प्रक्रिया.

ई-पीक पाहणी ॲप ओपन झाल्यावर पुढे जा या बटनवर क्लिक करा.

शेतकऱ्यांनी मोबाइल नंबर अचुक टाकावा, एकदा नमुद केलेला मोबाईल नंबर नष्ट करता येत नाही मात्र बदल करता येतो.

नोंदणीकृत मोबाइल नंबर मधून कमाल 20 शेतकऱ्यांची पीक पाहणी करता येईल. एका खातेदारांची नोंदणी किंवा ई पीक पाहणी पुर्ण केल्यानंतर दुसऱ्या खातेदाराची ई पीक पाहणी करण्यासाठी मोबाईल अॅप मधील नवीन खातेदार नोंदणी करा या टॅब चा वापर करावा.

ज्या गावामध्ये ई-पीक पाहणी नोंदणी करावयाची आहे तो जिल्हा, तालुका व गाव निवड करणे.

ई पीक ॲप मध्ये शेतकरी त्यांचे पहिले, मधले व आडनाव यावरुन नाव मराठी मधून शोधू शकतात तसेच खाते क्रमांक व गट क्रमांक यावरुन देखील खातेदाराचे नाव शोधता येईल.

ज्या खातेदाराचे एकाच महसुली गावात एका पेक्षा अधिक खाते क्रमांक आहेत, त्यांनी त्यांचे नाव नमूद केल्यास, त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक व त्याखालील सर्व भूमापन/गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणीसाठी उपलब्ध दिसतील.

शेतकरी बांधव आपले नाव मराठी मध्ये शोधू शकतील यासाठी मोबाईल मध्ये Google Indic Keyboard (Google Input ) हे ॲप असल्यास मराठी भाषेतील नाव शोधणे सोपे जाईल.

मोबाईल नंबर नोंदणीकृत केल्यानंतर चार अंकी सांकेतांक क्रमांक येईल आणि तो कायम राहील. नोंदणी केलेल्या मोबाईल मध्ये सांकेतांक व खातेदाराचे नाव येणारा मॅसेज येईल. सांकेतांक क्र. लक्षात नसल्यास ॲप मध्ये सांकेतांक विसलात या टॅब चा वापर करावा, सांकेतांक क्र. परत दिसेल.

यानंतर तुम्हाला एक dashboard दिसेल यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील जसे की,

A. परिचय

परिचय या बटनाला टच करून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरा, तुमचा फोटो देखील अपलोड करू शकता. हा फोटो मोबाईल मध्ये साठविलेला मोबाईल गॅलरी मधील फोटो निवडता येईल.

B. पिकाची माहिती नोंदवा

यामध्ये दोन टॅब आहेत

१) पीक पेरणीची माहिती भरा २) पीकांची माहिती

१) पीक पेरणीची माहिती भरा - पीक पेरणीची माहिती या सदरामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा भुमापन क्र./स नं /गट क्रमांक निवडायचा आहे.

जसेही तुम्ही तुमच्या शेत जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमीनीचे एकुण क्षेत्र व पोट खराबा याबाबत सर्व माहिती या ठिकाणी आपोआप दर्शविली जाईल.

हंगाम निवडा यामध्ये शेतकरी खरीप, रब्बी, उन्हाळी किंवा संपूर्ण वर्ष या पैकी योग्य  हंगाम निवडू शकतात.

पीक पेरणेसाठी (लावणीचे) उपलब्ध क्षेत्र हे या ठिकाणी आपोआप दर्शविले जाईल.

पिकांचा वर्ग या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील जसे की, निर्भेळ पिक म्हणजेच एक पिक पद्धती , मिश्र पिक म्हणजेच अनेक पिके पद्धती , पॉलीहाउस पिक, शेडनेटहाउस पिक, पड क्षेत्र या पैकी योग्य पर्याय या ठिकाणी निवडावा.

जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापुर्वी जमीनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करुन त्या नंतर पेरणीची माहिती नोंदवा.

पीकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्भेळ पीकाचा प्रकार पीक व फळपीक हे दोन पर्याय दिसतील अशा वेळी योग्य तो पर्याय निवडावा. पीक हा पर्याय निवड करुन शेतातील घेतलेल्या पीकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंद करावी फळपीक हा पर्याय निवडल्यास  शेतामध्ये आंबा व इतर फळ पीक असल्यास ते निवड करुन झाडांची संख्या व क्षेत्र नमुद करता येईल.

मिश्र पीक निवडल्यानंतर तुमच्या शेतामध्ये एकाच वेळी त्याच क्षेत्रात जी पिके लावलेली आहेत आणि जेवढ्या क्षेत्रावर लावलेली आहेत व त्यांचे  क्षेत्र या ठिकाणी भरावे .

चालु हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पड क्षेत्र निवड करावे.

पड क्षेत्र मध्ये उपप्रकार -लागवड योग्य पड निवडणे त्यानंतर चालु हंगामामध्ये 16 प्रकारांची चालू पड क्षेत्र फोटो न काढता भरता येईल याठिकाणी जलसिंचनाचे साधन नमूद करायचे असल्यास त्याचे क्षेत्र नमूद करून नमूद करता येईल.

जल सिंचनाचे साधन या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीवर टच करतातच सिंचनाचे अनेक साधने या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यापैकी तुमची तुमच्या पिकांना पाणी देण्यासाठी ज्या जल सिंचन साधनाचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडता येईल.

त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे जसे कि ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे सिंचन या पैकी एक पर्याय या ठिकाणी शेतकऱ्याने निवडणे अपेक्षित आहे..

शेतकरी या ठिकाणी पीक पेरणी केलेला/लागवड केलेल्या पीकांचा दिनांक नमूद करतील.

२) पीकांची माहिती – हा पर्याय वापरून आपण अपलोड केलेल्या पिकांची माहिती व त्यांचे मान्यते बाबतची सध्यस्थिती पाहता येईल.

C.कायम पड नोंदवा

जमीन क्षेत्रातील काही जमीन शेत कायम  पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड करणे शक्य  नसल्यास अशावेळी  कायम पड क्षेत्र निवडावे . कायम पड मध्ये सदर क्षेत्रांचा फोटो न काढता देखील माहिती भरता येते. सामान्यत: ज्या खडकाळ, मुरमाड, माळरान जमिनीवर कसलेही लाभदायी पीक निघू शकत नाही, अशा जमिनी यात मोडतात. याठिकाणी जलसिंचनाचे साधन भरण्यास उपलब्ध होणार नाही.

कायम पड यामध्ये 59 प्रकारांची पड क्षेत्राची माहिती फोटोशिवाय भरता येईल. कायम पड हि माहिती एकदाच भरावी लागेल प्रत्येक हंगामात भरावी लागणार नाही.

D.बांधावरची झाडे नोंदवा

बांधावरील झाडाचे पर्याय  निवड करावे

झाडांची संख्या नमुद करावी

बांधावरील झाडाचे क्षेत्र नमुद करण्यास उपलब्ध होणार नाही.

बांधावरील झाडाचा फोटो काढावा आणि सबमिट करावा.

E. अपलोड

शेतकरी याठिकाणी पीक पेरणी केलेल्या पिकांचा फोटो अपलोड करतील त्यावेळी मोबाइल फोनचे लोकेशन सुरु असणे गरजेचे आहे. शेतात पीक उभे असताना पिकाचा फोटो काढावा. फोटो काढताना पेरलेल्या पिकांच्या मध्यभागी जाऊन काढावा जेणेकरुन Geotagging अचुक येईल.

फोटो काढल्यावर submit या बटनावर टच करा. तर अशा पद्धतीने पीक माहिती सबमिट आणि अपलोड होईल. मोबाईल गॅलरी मधील फोटो पिकाचा फोटो म्हणून अपलोड करता येणार नाही.

शेतकरी यांनी पीक पेराची माहिती भरताना शेती क्षेत्रात मोबाइल नेटवर्क नसल्यास शेतकरी हे मोबाईल नेटवर्क/इंटरनेट क्षेत्रामध्ये आल्यानंतर अपलोड हे बटन दाबून शेतात केलेली पीक पाहणी अपलोड करता येईल

F. पीक माहिती मिळवा

तुम्ही भरलेली पिकांची माहिती येथून पाहू  शकता.

                            त्यानंतर ही सर्व माहिती  संबंधित तलाठी यांचेकडे ऑनलाईन पद्धतीने तत्काळ उपलब्ध होईल. तलाठी किंवा कृषी सहयाक आपल्याला नेमून दिलेल्या गावातील कोणत्याही १०% स.न. मधील पिकांची पडताळणी करतील व हे काम योग्य पद्धतीने होत आहे ना? ह्याची काळजी घेतील. तलाठी यांचे मान्यते नंतर ही माहिती गा.न.न. ७/१२ च्या नमुना १२ मध्ये नोंदविला जाईल.


Original Post by
रामदास जगताप सर
राज्य समन्वयक ई-पीक पाहणी प्रकल्प

Comments

Archive

Contact Form

Send