अनधिकृत वहिवाटीची नोंद
वाचा : महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम
कलम २ (६) ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे आणि
सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३१ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६,
कलम २४२
प्रसादरावांची शेतजमीन गावी असली तरी
ते स्वत: शहरात राहत असत. त्यांचे शेत केशव नावाची व्यक्ती अनाधिकाराने
वहिवाटत होती.
एक दिवस केशव तलाठी कार्यालयात आला
आणि त्याने त्याचे नाव प्रसादरावांच्या शेतात वहिवाटदार म्हणून दाखल करावे अशी
विनंती केली.
योगायोगाने मंडलअधिकारी तलाठी
चावडीतच होते. त्यांनी केशवला विचारले की तो कोणत्या कायदेशीर दस्ताच्या आधारे
प्रसादरावांची शेतजमीन वहिवाटत आहे. केशवकडे समाधानकारक उत्तर नव्हते.
मंडलअधिकार्यांनी त्याला समजवले
की,
महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम
कलम २ (६) अन्वये ‘व्यक्तिश: जमीन कसणे’ याचा अर्थ ‘‘स्वत:साठी (एक) स्वत:च्या महेनतीने, अथवा (दोन) स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही
व्यक्तीच्या कष्टाने अथवा (तीन) स्वत:च्या किंवा स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली, मजुरीने कामावर लावलेल्या
मजुरांकडून, त्यांना
पिकाच्या हिश्श्याच्या स्वरूपात मोबदला न देता,
रोख रक्कम अथवा वस्तूंच्या रूपात वेतन/मोबदला देऊन,
जमीन कसून घेणे’’ असा आहे. याचाच अर्थ अधिकृत अधिकाराशिवाय
कोणालाही कोणाचीही जमीन वहिवाटता येत नाही.
अनाधिकाराने किंवा दंडेलशाहीने अनधिकृत
वहिवाट करणार्या व्यक्तीला तत्काळ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम
२४२ अन्वये कारवाई करुन घालवून देता येते. यावर्षी जर पिक- पाहणीच्यावेळी तु
प्रसादरावांच्या शेतात दिसलास तर मी तुझ्याविरूध्द कारवाई करण्याचा प्रस्ताव
तहसिलदारांकडे पाठवीन.
तलाठी भाऊसाहेबांनी मंडलअधिकार्यांना
पिक-पहाणी बाबत सविस्तर माहिती देण्याची विनंती केली.
मंडलअधिकार्यांनी सांगितले की,
तलाठी दप्तरात गाव नमुना सात-ब ठेवला जातो. याला "अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्ज्यात
असल्याचे मानण्यात येणार्या व्यक्तीव्यतिरिक्त इतर इसमाच्या कब्ज्यात असलेल्या
जमिनीची नोंदवही" म्हणतात. या नोंदवहीचा मुख्य उद्देश अनधिकृतपणे शेतजमीन
कसण्यास/कब्ज्यात ठेवण्यास प्रतिबंध व्हावा आणि शेतकर्याला अशा बेकायदेशीर
बाबींपासून संरक्षण मिळावे हा आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि
नोंदवह्या (तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३१ अन्वये ही
नोंदवही ठेवली जाते.
महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका-
खंड ४ मधील प्रकरण दोन, परिच्छेद ४ आणि ५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पीक पाहणीची
कामे वर्षात दोन वेळा करायची असतात.
१. खरीप हंगामात (०१ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर)
२. रब्बी हंगामात (१५ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार
अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३०
(१) नुसार, पिके जेव्हा शेतात उभी असतील त्या काळात तलाठी यांनी व्यक्तीश:
शेतावर जाऊनच पीक पाहणी करणे आवश्यक असते.
पीक पाहणी करतांना तलाठी यांना जर असे
निदर्शनास आले की, एखाद्या शेतजमिनीत, अधिकार अभिलेखानुसार शेतजमीन कब्ज्यात असल्याचे
मानण्यात येणार्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर इसमाचा कब्जा/वहिवाट, कायदेशीर दस्तऐवजाशिवाय आहे, तर तलाठी यांनी गाव नमुना
सात-ब मध्ये या गोष्टीची पेन्सिलने नोंद घ्यायची
असते. यानंतर त्या शेतजमिनीबाबत नमुना १४ चा
फॉर्म भरून शक्य असेल तितक्या लवकर (कमाल दहा दिवसांत) तहसिलदाराकडे
पाठविणे आवश्यक असते. शेतजमीन मालकाशिवाय दुसर्या व्यक्तीचे नाव सात-बारावर पीक
पाहणी सदरी थेट लावण्याचे अधिकार तलाठी यांना नाहीत.
शेतजमीन मालकाच्या एकत्र कुटुंबातील अन्य
सदस्य शेतजमिनीत वहिवाट करीत असतील तर नमुना १४ चा फॉर्म भरता येत नाही. ज्या
शेतजमिनीबाबत नमुना १४ चा फॉर्म भरला असेल त्या शेतजमिनीच्या गाव
नमुना १२ मध्ये कोणतीही नोंद न घेता, त्याच्या उचित स्तंभात "नमुना १४ भरुन
पाठवला-निर्णयाधिन" अशी पेन्सिलने नोंद घ्यावी.
तहसिलदार अशा प्रकरणाची स्वत: किंवा
नायब तहसिलदार मार्फत चौकशी करतात व अशा प्रकरणावर निकाल देतात. तहसिलदार यांनी
'नमुना १४ च्या फॉर्ममध्ये नाव असणारी व्यक्ती कायदेशीरपणे
शेतजमीन कसत आहे' असा निकाल दिला तर गाव नमुना क्रमांक ७ब मध्ये तहसिलदार यांनी
सदर बाबत दिलेल्या निकालाचा क्रमांक व दिनांक शेरा स्तंभात लिहून तशी नोंद
करावी. जर तहसिलदार यांनी 'नमुना १४ च्या फॉर्ममध्ये नाव असणारी व्यक्ती
अनाधिकाराने शेतजमीन कसत आहे' असा निकाल दिला तर गाव नमुना सात-ब मधील पेन्सिलची
नोंद खोडून टाकावी.
कोणत्याही नोंदणीकृत दस्ताशिवाय किंवा
कायदेशीर कागदपत्राशिवाय, अनाधिकाराने किंवा दंडेलशाहीने अशी वहिवाट सुरू असेल तर तत्काळ
अशी वहिवाट करणार्याविरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २४२ अन्वये
कारवाई करता येते.
ही सविस्तर तरतुद ऐकल्यानंतर
केशवला कळले की त्याची वहिवाट अनधिकृत असल्यामुळे त्याचे नाव कधीच वहिवाटदार म्हणून
दाखल होऊ शकत नाही.
Comments